सोलापूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गणपतराव देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचे प्रश्न अत्यंत धडाडीने मांडले. सामान्यांच्या उत्थानासाठी सातत्याने ते जीवनभर झटत होते. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे; मात्र राजकारणातील शाश्वत सत्य हे गणपतराव देशमुख होते. त्यांनी परिवर्तनाचे सर्व नियम बाजूला ठेवून एकाच विचाराने काम केले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार होते. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार संजयकाका पाटील, सर्वश्री आमदार जयंत पाटील, बबनराव शिंदे, संजय शिंदे,सचिन कल्याणशेट्टी,शहाजी पाटील, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते, राजेंद्र राऊत,यशवंत माने,राम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
गणपतराव देशमुख 11 वेळा विधानसभेवर:कापूस मोठ्या प्रमाणावर पिकणाऱ्या भागात सूतगिरणी चालवणे कठीण आहे. तरी गणपतराव देशमुख यांनी सांगोला सारख्या दुष्काळी भागात सूतगिरणीची स्थापना करून या भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. अनेक संकटाचा सामना करून ही सूतगिरणी यशस्वीपणे चालवली. गणपतराव देशमुख यांची राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्याला बळ मिळू दे, अशी प्रार्थना त्यांनी केली. सांगोला तालुक्यातील नागरिकांनी गणपतराव देशमुख यांना अकरा वेळा विधानसभेवर पाठवून या भागातील प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या मार्फत शासनाकडून न्याय मिळवून देण्याची मोठी कामगिरी करून घेतली असल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी केले. शेतकरी कामगार व वंचित घटकाबद्दल सातत्याने त्यांचे प्रश्न मांडून त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणारे गणपतराव देशमुख यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचप्रमाणे दुष्काळी भाग असला तरी मानाने कसे जगायचे ही कार्यपद्धती त्यांनी या भागातील लोकांच्या अंगी रुजवल्याचे मत व्यक्त केले.