सोलापूर MD drugs seized :सोलापूर शहरानजीक असलेल्या चिंचोळी एमआयडीसीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. सोलापूर पोलिसांनी केलेल्या तपासात एक कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील मोहोळ पोलिसांनी उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात जाऊन ड्रग्ज डीलर छोटूच्या मुसक्या आवळल्या आहेत. छोटू उर्फ चंद्रभानसिंग कौल असं अटक केलेल्या संशयीत आरोपीचं नाव असून तो सोलापूर एमआयडीसीत ड्रग्ज तयार करुन उत्तर प्रदेशात जाऊन विक्री करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मोहोळ पोलिसांची कारवाई : मोहोळ पोलिसांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर कारवाई करत दत्तात्रय लक्ष्मण घोडके व गणेश उत्तम घोडके (रा औंढी,ता मोहोळ जि सोलापूर) या दोघांना एमडी ड्रग्ज साठ्यासह अटक केली होती. ड्रग्ज विक्री करणाऱ्या घोडके बंधूचा कसून तपास करत असताना, तिसऱ्या संशयीत आरोपीचा सुगावा मोहोळ पोलिसांना लागला. सध्या राज्यभरात ड्रग्ज प्रकरणी कारवाया होत असल्यानं ड्रग्ज डीलर छोटू उत्तर प्रदेशात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मोहोळ पोलिसांनी उत्तर प्रदेशातील चित्रकूट इथं जाऊन छोटू उर्फ चंद्रभान सिंग मोहनलाल कौल यास ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 1 कोटी 27 लाखांचा एमडी ड्रग्जसाठा जप्त केला. तसंच छोटूनं सोलापूर इथं चिंचोळी एमआयडीसीतील ड्रग्ज फॅक्टरीची माहिती दिल्यानंतर मोहोळ पोलिसांनी त्या ठिकाणी जात कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जसदृश्य कच्चा माल जप्त केला.