महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनपा परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यात महापौर यशस्वी

गेल्या 14 दिवसांपासून पगारासाठी सुरु असलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यात महापौर शोभा बनशेट्टी यशस्वी ठरल्या आहेत. पालिका परिवहन कर्मचाऱ्यांना २ महिन्यांचा पगार मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या तोंडावर हसू आले आहे.

By

Published : Feb 5, 2019, 3:13 PM IST

Updated : Feb 5, 2019, 3:23 PM IST

सोलापूर -गेल्या 14 दिवसांपासून पगारासाठी सुरु असलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यात महापौर शोभा बनशेट्टी यशस्वी ठरल्या आहेत. पालिका परिवहन कर्मचाऱ्यांना २ महिन्यांचा पगार मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या तोंडावर हसू आले आहे. संप काळात तोडगा निघावा म्हणून कामगारांनी अनेक जणांकडे पदर पसरला होता पण त्यांना आश्वासनेच मिळत होती.

solapur


शुक्रवार पेठेतील काही कर्मचाऱयांनी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या घरी जाऊन संपावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी भेट घेतली. त्यानंतर महापौरांनी तत्काळ महापालिका गाठून आयुक्तांना बोलावून घेतले. २ तासाच्या चर्चेतून अखेर आयुक्तानी महापौरांना २ महिन्याचे वेतन देतो असे सांगितले. त्यानंतर महापौरानी सभागृहनेते संजय कोळी, परिवहन सभापती तुकाराम मस्के या दोघाना घेऊन सातरस्ता बस डेपो येथील आंदोलनाचे ठिकाणी पोहोचले. तेथेही या तोडग्याला काही कर्मचारी मान्य करीत नव्हते पण महापौर स्वत: या प्रकरणात लक्ष घालून रक्कम मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि स्वत: मानापमान न बाळगता आंदोलनाच्या ठिकाणी येऊन संप मिटवण्यासाठी विनंती करीत आहेत, असे इतर कामगारांनी चर्चेत सांगितल्यानंतर सर्वांनी या तोडग्याला मान्यता दर्शविली.

solapur


आजपर्यंत कर्मचाऱयांना विविध संस्था व व्यापारी दुपारचे जेवण पुरवित होते. आज दुपारचे जेवण नगरसेवक चेतन नरोटे यांनी पुरविण्याचे ठरविले होते. नगरसेवक अमोल बापू शिंदे या दोघानीही कामगारांना सांगितले की, महापौरांनी स्वत:च्या शब्दाची प्रतिष्ठा करीत हा तोडगा काढलेला आहे, तुम्ही याला नाही म्हणू नका अशी समजूत घातली. त्यानंतर सर्व कामगारांनी कामगार एकजुटीचा जयजयकार करीत महापौरांना धन्यवाद दिले.

solapur


त्याचबरोबर सभागृहनेते संजय कोळी, परिवहन सभापती तुकाराम मस्के, नगरसेवक चेतन नरोटे, अमोल शिंदे यांना धन्यवाद दिले आणि हा संप मिटविला. अनेक दिवसापासून परिवहनला एकही रुपाया देणार नाही अशी भूमिका घेतलेल्या आयुक्तामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले होते. हा संप आणखी किती दिवस चालेल याची भिती कर्मचारी व नागरिक यांना होती परंतु आज अखेर हा संप मिटला.
महापौरांनी सर्व कर्मचाऱयांना या संस्थेमध्ये प्रामाणिकपणे काम करुन या संस्थेस उर्जितावस्थेत आणावे यामध्येच तुमची उन्नती आणि प्रगती होणार आहे. जर मागील कारभाराप्रमाणे अशाच प्रकारे हलगर्जिपणा व अप्रामाणिकपणाने संस्था चालविलात तर एकदिवस ही संस्था नक्कीच बंद पडेल, आपण सर्वानी मिळून अत्यंत जागरुगतेने ही संस्था चालवूया, असे सांगितले व यामध्ये कुणी गैरकारभार अथवा भ्रष्टाचार करीत असतील तर त्यांना तेथेच आळा घालावा, असे आवाहन महापौरांनी कर्मचायाना केले.

Last Updated : Feb 5, 2019, 3:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details