सोलापूर - राज्य शासनाने केशरी कार्ड धारकांना 3 किलो गहू प्रतिव्यक्ती 8 रुपये किलो प्रमाणे व दोन किलो तांदूळ प्रतिव्यक्ती 12 रुपये किलो देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केशरी कार्ड धारकांना सोलापूर शहरात व ग्रामीण भागात वितरण सुरू करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात 389082 एवढया केशरी कार्ड धारकांना गहू व तांदूळ मिळेल. यासाठी तांदूळ 14970 क्विंटल , गहू 22110 क्विंटल FCI गोडावून मधून उचलण्यात आले असून त्याचे रेशन दुकान निहाय वितरण सुरु आहे, अशी माहिती मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
केसरी कार्ड धारकांना मे आणि जून महिन्याचे धान्य वाटप सुरू - केसरी कार्ड धारकांना मे आणि जून महिन्याचे धान्य वाटप सुरू
केसरी रेशन कार्ड धारकांना धान्य वितरण सुरू करण्यात आले आहे. मे आणि जून या दोन महिन्याचे धान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जवळपास 4 लाख केसरी कार्ड धारकांना हे धान्य दिले जाणार असल्याचे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले आहे.
आजपर्यंत माढा, करमाळा, माळशिरस, पंढरपूर तालुक्यातून सुमारे 25 टक्के वाटप झाले आहे. शहरालगत असणाऱ्या दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ आणि अक्कलकोट तालुक्यांत येत्या दोन दिवसांत धान्याचे वितरण गतीने करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. केसरी कार्ड धारकांनी त्यांच्या रेशन दुकानाशी संपर्क साधून आपले धान्य प्राप्त करुन घ्यावे. धान्य नेण्यासाठी येताना तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधावा. एकमेकामध्ये सहा फुट अंतर ठेवावे. एकाच व्यक्तीने धान्य खरेदीसाठी रेशन दुकानात यावे. जिल्ह्यात पुरेसे धान्य उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.