सोलापूर -लॉकडाऊननंतर प्रत्येक वस्तूच्या किमतीमध्ये थोडीशी वाढ झाल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्येही शुल्कवाढ होत आहे. सोलापुरातील खासगी रुग्णालये व खासगी नर्सिंग होममधील प्रसुती शुल्क अंशतः वाढवण्यात आले आहे. त्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णांना या महागाईचा सामना करावा लागत आहेत. नैसर्गिक प्रसूती आणि सीजेरियन(कृत्रिम प्रसूती) यामधील शुल्कात वाढ झाली आहे. याबाबत ईटीव्ही भारतने सविस्तर आढावा घेतला आहे.
सोलापूर स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. किरण सारडा यांच्याकडून याबाबत अधिक माहिती मिळाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड-19च्या प्रादुर्भाव नंतर अनेक स्त्री रोग तज्ञांनी आपल्या नर्सिंग होममधील चार्जेस(शुल्क)मध्ये अंशतः वाढ केली आहे. कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांना व संबंधित रुग्णालयाला काही उपाययोजना कराव्या लागत आहेत. त्यासाठी रुग्णालयांना अधिक खर्च करावा लागत आहे. उदाहणार्थ दर दोन ते तीन दिवसाला हॉस्पिटलचे निर्जंतुकीकरण करणे, सॅनिटायझरचा उपयोग, पीपीई किट यांचा खर्च रुग्णालयांना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी अंशत: शुल्कवाढ केली आहे, असे डॉ. किरण सारडा यांनी सांगितले.
काही रुग्णांना पंचतारांकित सेवांची गरज असते. उच्चवर्गीय गर्भवती महिला प्रसूतीसाठी उत्तम व पंचतारांकित सेवा असणाऱ्या रुग्णालयांची निवड करतात. या रुग्णालयांमध्ये नॉर्मल डिलिव्हरी चार्जेस व सीजेरियन डिलिव्हरी चार्जेस महाग असतात. त्या ठिकाणी भौतिक सुविधा अधिक असतात. अशा ठिकाणी रुग्णांना साहजिकच अधिकची रक्कम मोजावी लागते. मात्र, सोलापूरमधील 85 टक्के डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयांमधील किंवा नर्सिंग होममधील शुल्कात फार वाढ केली नसल्याची माहिती डॉ. किरण सारडा यांनी दिली.
कोविडच्या काळात सोलापूर शहर प्रशासनाने असा आदेश काढला होता की, नर्सिंग होम, अधिक बेड असणाऱ्या रुग्णालयांचे 80 टक्के बेड अधिग्रहित केले जाणार आहे. मात्र, शासनाने तसे काही केले नाही. उलट सोलापूरमधील 22 डॉक्टरांनी स्वतः हून कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा दिली. यातील काही स्त्री रोग तज्ञांना तर कोविड-19ची लागण देखील झाली होती.
लॉकडाऊन लागू झाल्यापासून आणि अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्या पासून अनेक रूग्ण बाहेर जाणे टाळत आहेत. अनेक गर्भवती स्त्रिया आपल्या स्त्री रोग तज्ञांकडून फोनवरून मोफत सल्ला घेत आहेत. अनेक स्त्रीरोग तज्ञही सोशल मीडियाच्या माध्यमातून मोफत ट्रिटमेंटचे सल्ले देत आहेत. नेहमीच्या तपासणीसाठी आलेल्या गर्भवती स्त्रियांना पूर्वी प्रमाणेच कन्सल्टिंग फी आकारली जात असल्याची माहिती डॉ. किरण सारडा यांनी दिली. काही डॉक्टरांनी अंशत: शुल्क वाढवले आहे. तो त्यांचा निर्णय आहे त्यावर 'गायनॅक असोसिएशनचे' नियंत्रण नसते, असेही त्या म्हणाल्या.
सोलापुरातील जवळपास सर्वच डॉक्टर आपल्या प्रत्येक शुल्काचे फलक दवाखान्यात लावतात. सोनोग्राफीचे शुल्क, अॅडमिट झाल्यावर बेडचे शुल्क, काही रुग्णांना स्पेशल रूमची आवश्यकता असते त्याचे शुल्क, आदी बाबत फलक लावलेले असतात. काही रुग्णांची आर्थिक परिस्थिती थोडी खालावलेली असते. अशावेळी रुग्णाचे नातेवाईक संबंधित डॉक्टरांना बिल कमी करण्यासाठी विनंती करतात. अनेक स्त्री रोगतज्ञ बिलात सूटही देतात. खासगी रुग्णालय व शासकीय रुग्णालयामध्ये फक्त सोयी सुविधांचा फरक आहे. बाकी सर्व काही सारखेच असते.
नैसर्गिक प्रसूती आणि कृत्रिम प्रसूती -
अनेक रुग्णांचे नातेवाईक हे नैसर्गिक प्रसूतीला प्राधान्य देतात. मात्र, स्त्री रोगतज्ञ हे गर्भवती महिलेच्या प्रसूती वेदना कमी करण्यासाठी व त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नशील असतात. परिस्थिती पाहून सीजेरियन करण्याचा निर्णय घेतला जातो. कृत्रिम डिलिव्हरीमुळे(सीझर) माता मृत्य दर व बाल मृत्यू दर कमी झाला आहे.