सोलापूर- गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील पुळूज गावात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शूरवीर शहीद धनाजी होनमाने यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - गडचिरोली
सोलापूर जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने हे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले. त्यांच्या प्रार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील सुपूत्र धनाजी होनमाने यांना वीरमरण आले. शहीद धनाजी होनमाने यांचे पार्थिव आज त्यांच्या मूळगावी आणण्यात आले.
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. शहीद धनाजी होनमाने अमर रहेच्या जयघोषात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी अत्यंत शोकाकूल वातावरणात शहीद शूरविराला अखेरचा निरोप दिला. यावेळी पोलिसांनी हवेत बुंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली.