पंढरपूर (सोलापूर) - सुमारे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला स्थगिती देत हे प्रकरण खंडपीठाकडे वर्ग केले आहे.
मराठा संघटना आक्रमक : पंढरपुरात राज्य सरकारच्या फलकाचे दहन - सोलापूर मराठा समाज आरक्षण आंदोलन बातमी
मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. तसेच हे प्रकरण खंडपीठाकडे वर्ग केले आहे. यामुळे आक्रमक झालेल्या मराठा संघटनाने सोलापूर जिल्ह्यासह पंढरपुरात राज्य सरकारच्या फलकाचे दहन केले.
![मराठा संघटना आक्रमक : पंढरपुरात राज्य सरकारच्या फलकाचे दहन maratha sanghatana agitation in pandharpur against suprime court decision about reservation](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8777592-10-8777592-1599912126804.jpg)
न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला, तसेच राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आरक्षण प्रश्नावरून मराठा समाजाच्या विविध संघटना पुन्हा आक्रमक होऊ लागल्या आहेत. पंढरपूर येथे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा विरोध करणाऱ्या फलकाचे दहन करून आंदोलन करण्यात आले.
सर्वोच्य न्यायालयात आरक्षणप्रश्नी राज्य सरकार बाजू मांडण्यास कमी पडल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. या आंदोलनाचा एका भाग म्हणून आज पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकार विरोधात निदर्शने करत आरक्षण मागणीच्या घोषणा दिल्या.
येत्या 20 सप्टेंबर पर्यंत राज्य सरकारने आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, त्यासाठी सरकारने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी कायदे तज्ज्ञांची फौज उभी करावी; अन्यथा सरकार विरोधात राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.
पंढरपूर येथे करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आकाश पवार, संदीप मुटकुळे, शहाजी शिंदे, गणेश चव्हाण, नीलेश गंगथडे, बापू चौधरी आदींसह मराठा समाजाचे बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.