पंढरपूरMaratha Reservation : सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. मात्र त्यावर सरकार काही तोडगा काढताना दिसत नाही. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोबरपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीत उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून, त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक गावात साखळी उपोषण करण्यात येत आहे. तसंच राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. तसे फलक देखील गावा-गावात लागल्याचं दिसून येत आहे.
शाहाजी बापूंनी मागितली आंदोलकांची माफी : राजकीय नेत्यांना गावबंदी असताना देखील नेते गावात जाताना दिसत आहेत. अशातच आज दुपारी पंढरपूर येथील कराड नाक्यावर शिंदे गट, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची गाडी आंदोलकांनी अडवली. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ड्रायव्हरनं गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलक संदीप मांडावे यांनी केला आहे. या प्रकारानंतर शहाजीबापू पाटील यांनी गाडीतून खाली उतरून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मला गावबंदीची माहिती नव्हती, मी तुमच्या पाया पडतो असं शाहाजी बापू आंदोलकांना म्हणताना दिसताय. यावेळी आंदोलकांची समजूत काढण्यासाठी आमदार शाहाजी बापू पाटील यांनी आंदोलकांची माफी मागितली.