आमदार सुभाष देशमुखांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया सोलापूर Maratha Reservation Issue :मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे करत आहेत. 24 डिसेंबरला देव जरी आला तरी मराठ्यांना आरक्षण मिळण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असं चॅलेंज त्यांनी केलं आहे. आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. आता सरकारने आरक्षण देण्यासंदर्भात दिलेला शब्द पाळावा, असं आवाहन जरांगे-पाटील करत आहेत. सोलापुरात भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांनी मराठा आरक्षण 24 डिसेंबरपर्यंत देणं शक्य नाही, असं मोठं विधान केलं आहे.
शिंदे समितीचा अहवालच आता आला आहे :आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शब्द दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवून निर्णय घेतला जाईल, मात्र 24 डिसेंबरपर्यंत याबाबत निर्णय होणं शक्य नाही. कारण, न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल आता प्राप्त झाला आहे. आरक्षण दिल्यानंतर ते रद्द होऊ नये, यासाठी सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे.
प्राप्त झालेल्या अहवालाचं अवलोकन होईल :मराठा आरक्षणाच्या बाबतीत हिवाळी अधिवेशनात अनेक आमदारांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मत व्यक्त केलं आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे त्यांना ते दिलं गेलं पाहिजे. न्यायमूर्ती शिंदे समितीनं आताच अहवाल सादर केला आहे. त्यानंतर अहवालाचं अवलोकन होईल आणि अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर होईल, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं.
त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले जाणार :मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे, त्यानुसार निर्णय होईल. फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वांनी संयम राखावा. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि आरक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन सुभाष देशमुख यांनी केलं.
हेही वाचा:
- मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परत येणार नाही, मनोज जरांगेंची गर्जना
- ठरलं! मनोज जरांगे पाटलांचं मुंबईत 20 जानेवारीपासून आमरण उपोषण; सरकारला दिला इशारा
- लोकसभा निवडणूक २०२४ : पुढील पंधरा दिवसात महाविकास आघाडीत कोण कुठून लढणार ते स्पष्ट होईल - सुप्रिया सुळे