पंढरपूर -मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र मोर्चा काढण्यावर आंदोलक ठाम आहे. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपुरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. शिवाय शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तरी पंढरपूरमध्ये तणावाचे वातावरण आहे.
मोर्चावर आंदोलक ठाम
आक्रोश मोर्चाची सुरुवात पंढरपूर येथील नामदेव पायरीला नतमस्तक होवून होणार आहे. त्यानंतर मोर्चा मुंबईच्या दिशेने आगेकूच करेल, असे मराठा राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी सांगीतले. मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातून तसेच जिल्ह्यातून मराठा बांधव पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. सकाळी अकरा वाजता पंढरपूर येथील नामदेव पायरीचे दर्शन घेऊन या मोर्चाची सुरुवात होईल. मात्र शहरात मोठा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा निघणार-
मराठा क्रांती मोर्चाकडून पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा निघणार आहे. मराठा आरक्षणासाठी समाजातील युवकांनी बलिदान दिले आहे. हे मराठा समाजाचे आंदोलन राज्यभर चालू आहे. राज्य शासन व पोलीस प्रशासनाने मोर्चा थांबवीला तर त्याचे पडसाद राज्यभर उमटतील. व त्यास पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे महेश डोंगरे यांनी दिला.
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात-
पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराजवळील रस्ते पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. नामदेव पायरी, आधार रोड प्रदक्षिणामार्ग, स्टेशन रोड, शिवाजी चौक, चंद्रभागा घाट याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. संचारबंदीमुळे पंढरपूर मधील मुख्य बाजारपेठ व्यापाऱ्यांकडून बंद ठेवण्याची शक्यता आहे. राज्य राखिव दलाच्या तुकड्याही शहरात तैनात करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-विधान परिषदेच्या १२ सदस्यांची यादी राज्यपालांकडे सादर; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष