पंढरपूर (सोलापूर) Chhagan Bhujbal On Manoj Jarange : आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी पंढरपूर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये व्यक्त केलं. पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानावर ओबीसी एल्गार मेळावा मंत्री छगन भुजबळ, गोपीचंद पडळर, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे आणि ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा पण...: मागील काही दिवसापासून मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होत आहे. आज एल्गार मेळाव्याच्या निमित्तानं छगन भुजबळ काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, मात्र ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असं ठणकावून सांगत एल्गार सभा छगन भुजबळ यांनी शेरोशायरी करत गाजवली.
नाव न घेता केली टिका : एल्गार मेळाव्याला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून ओबीसी बांधव उपस्थित होते. त्यांना संबोधित करताना जरांगे पाटील यांच्या मुंबई भेटी दौऱ्यावर टीका करत, गरीब लोक मुंबईला 200 गाड्या घेवून जागेची पाहणी करण्यास गेले. यांच्या सभेवर 200 जेसीबी घेऊन फुलांची उधळण होते, अशी उपासात्मक टीका त्यांनी जरांगे पाटील यांचं नाव न घेता केली.