सोलापूर - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या युवकांना व्यवसायासाठी 'बँकांमार्फत कर्ज' ही सरकारची योजना फसवी ठरलीय. त्याचा निषेध करण्यासाठी सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने हलगी नाद आंदोलन करण्यात आले.
सरकारी हमीवर मराठा युवकांना कर्ज मिळेना; सकल मराठाकडून हलगी नाद - माऊली पवार
मराठा तरुणांना व्यवसायासाठी बँकामार्फत कर्ज, ही योजना फसवी... सकल मराठा समाजाचा आरोप... सोलापुरात सरकारी बँकांपुढे हलगीनाद करून केला निषेध ...
जिल्ह्यातील साडे तीन हजार अर्जदार युवकांपैकी फक्त ११७ जणांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. मराठा युवकांच्या कर्जाची हमी सरकारने घेतलेली असतानाही उर्वरित युवकांना फक्त बँकांमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. एवढेच नाही तर गरजूंना बँक प्रशासनाकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. त्यामुळे सरकारी योजना आणि बँकाबाबत मराठा तरुणांमध्ये संताप आहे. म्हणूनच त्यांच्या फसव्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी सोलापुरात सकल मराठा समाजाच्यावतीने स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी सरकारनं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून बँकांना हवाला दिला, पण तो देताना बँक व्यवस्थापनाला सक्त आदेश दिला नाही. त्यामुळं बँकांमध्ये ही ससेहोलपट सुरू आहे. त्याचा त्वरित निपटारा व्हावा, अन्यथा तीव्र आंदोल करू असा इशाराच सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक माऊली पवार यांनी यावेळी आंदोलकांच्या वतीने दिला.