सोलापूर- जिल्ह्यात मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज बंद पुकारण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर देखील आंदोलने करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात माढामध्ये उग्र स्वरूपाच्या निदर्शने करून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी ठिय्या तर काही ठिकाणी रॅली काढून बंद पाळण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा देत राज्य सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला. तर पंढरपुरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक, पंढरपुरात ठिय्या आंदोलन सुरू - मराठा आरक्षणासाठी सोलापूर बंद
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने सुरू असताना आज सोलापूर बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातील गावागावातून प्रतिसाद मिळत आहे. पंढरपुरातही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षण स्थगिती प्रकरणी आज पुकारलेल्या सोलापूर जिल्हा बंदमध्ये आंदोलकांनी पंढरपूर-पुणे महामार्ग रोखून धरला. माढ्यात रस्त्यावर टायर जाळल्यानंतर वेळापूरच्या पुढे असणाऱ्या निमगाव पाटीजवळ मराठा तरुणांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता अडवला. एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा देत दोन्ही बाजूनी वाहतूक आंदोलकांनी रोखून धरली. पंढरपूर येथील शिवाजी चौकात मराठा समाजाच्या वतीने मोठे आंदोलन उभे करण्यात आले आहे. पंढरपूर विविध पक्षानी या आंदोलन सहभागी झाले आहे. जागरण गोंधळ, ढोलकी वाजवत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी पंढरपूरसह जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सोलापूर बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापुरात आज सकाळपासूनच बंदला सुरुवात झाली आहे. माढ्यात तर रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सोलापुरात एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे.