सोलापूर - मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठविण्यात यावी या मागणीसाठी राज्यभरात ठीकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. आज सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली असता, तिऱ्हे येथे सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आरक्षणापूर्वी कोणतीही सरकारी नोकर भरती करू नये, आरक्षणासंदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. जिल्ह्यातील अनेक भागात रास्तारोको, रॅली आणि बंद पाळून आंदोलने करण्यात येत आहेत. त्यानुसार उत्तर तालुक्यातील तिऱ्हे गावातही सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.