सोलापूर -मराठा क्रांती मोर्चात हजारोंच्या जनसमुदायाने सहभाग घेतला होता. पोलीस परवानगी नसतानाही हजारोंच्या संख्येने मराठा बांधव, तरुण, तरुणी व महिलांचा मोठा सहभाग होता. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत एक मराठा ! लाख मराठा आवाजाने सोलापूर शहर व परिसर दुमदुमून गेला होता. आरक्षण मिळणे हा मराठा समाजाचा हक्क आहे, शासन कोणत्याही प्रकारची मेहरबानी करत नाही, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. बंदी झुगारून संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आक्रोश मोर्चा सुरू झाला आणि पायी जात पार्क चौक येथे समाप्त झाला. पाच जणांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले.
सोलापुरात मराठ्यांचा आरक्षणासाठी आक्रोश.. आरक्षणासाठी मराठ्यांचा आक्रोश -
आरक्षणासाठी सोलापुरात यापूर्वी 2018 साली सकल मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चा झाला होता. सुप्रीम कोर्टाने 5 मे रोजी मराठा आरक्षण रद्दबातल ठरवले होते. त्यावरोधात आज (रविवारी 4 जुलै) रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. दोन वर्षांपासून गप्प झालेला मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक दिसून आला. पोलिसांनी या आक्रोश मोर्चावर बंदी घातली होती. तरी देखील ही बंदी झुगारून आरक्षणासाठी मराठ्यांचा आक्रोश पाहावयास मिळाला.
सोलापुरात मराठ्यांचा आरक्षणासाठी आक्रोश.. एक मराठा ! लाख मराठा! या आवाजाने सोलापूर दणाणून गेले - तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 16 टक्के आरक्षण मंजूर केले होते. यावर उच्च न्यायालयात देखील सुनावणी झाली होती. उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी मराठा आरक्षण रद्द करत महाराष्ट्र राज्यात 50 टक्केच्या वर आरक्षण देता येणार नाही, असा निकाल दिला होता. त्यावरून मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली होती आणि राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकले नाही. राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाला मराठा समाज मागासवर्गीय असल्याचा अहवाल द्यावा अशी मागणी जोर धरली आहे.
सोलापुरात मराठ्यांचा आरक्षणासाठी आक्रोश.. मराठा क्रांती मोर्चाने आक्रोश मोर्चाची दिली होती हाक - सोलापुरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा असे दोन गट आहेत. मराठा क्रांती मोर्चामधील किरण पवार आणि राम जाधव यांनी नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 4 जुलै रोजी आक्रोश मोर्चाची हाक दिली होती. कोरोना महामारी किंवा कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी अनेक निर्बंध टाकून आक्रोश मोर्चा दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ही बंदी झुगारून आक्रोश मोर्चा संपन्न झाला.