पंढरपूर (सोलापूर) -सोलापूर येथील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आक्रोश मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातून भाजप आमदार व कार्यकर्ते जात असताना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. यामध्ये मंगळवेढातून आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे तर टेंभुर्णी येथून आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना ग्रामीण पोलिसांनी रोखले. त्यामुळे आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी आमदारांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
सोलापूर जिल्ह्यात मराठा आक्रोश मोर्चा.. आमदार समाधान आवताडे यांची देगाव येथे ठिय्या आंदोलन -
मराठा आक्रोश मोर्चासाठी सोलापूर शहराच्या दिशेने निघालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना मंगळवेढा तालुक्यातील देगाव येथे रोखण्यात आले. सोलापूर जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच ग्रामीण पोलिसांकडून प्रत्येक ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आमदार समाधान आवताडे यांना रोखण्यात नंतर चार कार्यकर्त्यांचे जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली. मात्र समाधान आवताडे यांनी प्रत्येक आंदोलनाच्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणी केली. मात्र पोलिसांकडून परवानगी न दिल्याने आमदार समाधान आवताडे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. याठिकाणी आमदार अवताडे व पोलिसांमध्ये खडाजंगी झाल्याचे दिसून आले.
टेंभुर्णी येथे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना कार्यकर्त्यांसह ताब्यात -
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर येथे आक्रोश मोर्चाची तयारी करण्यात आली होती. मात्र त्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील अकलूज येथील कार्यकर्त्यांचे टेंभुर्णी मार्गे सोलापूर येथे जात असताना टेंभुर्णी येथे रोखण्यात आले. मात्र आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पोलिसांनी रोखल्यामुळे जाग्यावरच ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आमदार मोहिते-पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यात सहभागी होण्यास निघालेल्या मराठा समाजातील बांधवांना पोलिसांकडून रोखण्यात आले. त्यातूनच वाद विवाद व घोषणाबाजी करण्यात आली.