महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आरक्षण आंदोलन LIVE : पंढरपुरात आक्रोश, तर वांद्रामध्ये मशाल मोर्चा.. - मराठा आक्रोश मोर्चा पंढरपूर तणाव

Maratha Aakrosh Morcha Pandharpur Andolan LIVE Updates
मराठा आक्रोश मोर्चा : पंढरपुरात तणावाचे वातावरण..

By

Published : Nov 7, 2020, 10:00 AM IST

Updated : Nov 7, 2020, 1:19 PM IST

13:16 November 07

सात-आठ गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना..

पोलीस प्रशासनाकडून सात ते आठ गाड्यांची बंदोबस्तात पंढरपुरातून रवानगी करण्यात आली आहे. क्रांती मोर्चाच्या या गाड्या पंढरपूर, अकलूज, इंदापूर, बारामती, पुणे, लोणंद, लोणावळा आणि चेंबूर अशा मार्गे शेवटी मंत्रालयावर जाणार आहेत. मंत्रालयामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व समन्वयक मुख्य सचिवांसोबत आपल्या मागण्यांबाबत चर्चा करतील.

13:01 November 07

काही आंदोलकांना पुण्यापर्यंत जाण्याची मुभा..

या आंदोलकांपैकी १५ ते २० आंदोलकांना पुण्यापर्यंत जाण्याची मुभा पोलिसांनी दिली आहे. मात्र, त्यांच्यासोबत पोलिसही असणार आहेत. 

13:00 November 07

पंढरपूर : आंदोलकांना ताब्यात घेत शहराबाहेर सोडले..

या आंदोलनासाठी शहरात संचारबंदी असूनही मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाले होते. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेत शहराबाहेर सोडले आहे. यानंतर शहरातील तणाव वाढला आहे.

11:51 November 07

काही कार्यकर्त्यांना नामदेव पायरीजवळ जाण्याची परवानगी..

मराठा क्रांती मोर्चाच्या पंधरा ते वीस कार्यकर्त्यांना नामदेव पायरी जवळ जाण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे.

11:50 November 07

शिवाजी चौक येथे घोषणाबाजी..

आंदोलनासाठी जमलेले मराठा बांधव छत्रपती शिवाजी चौक येथे मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना दिसले. याठिकाणी प्रामुख्याने राज्य सरकार व केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. "आरक्षण आमच्या हक्काचं...", तसेच, "जय जिजाऊ जय शिवराय" अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या.

11:16 November 07

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील परिस्थिती..

मराठा आक्रोश मोर्चा : पंढरपुरात तणावाचे वातावरण..

मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने पंढरपुरातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

11:15 November 07

मुंबईतही मशाल मोर्चा..

मुंबईमध्येही आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वांद्रे ते मातोश्रीपर्यंत मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी हा मोर्चा पार पडणार आहे.

09:57 November 07

पंढरपुरात संचारबंदी लागू..

शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपुरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. शिवाय शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या पंढरपूरमध्ये तणावाचे वातावरण आहे.

09:56 November 07

मोर्चावर आंदोलक ठाम..

आक्रोश मोर्चाची सुरुवात पंढरपूर येथील नामदेव पायरीला नतमस्तक होवून होणार आहे. त्यानंतर मोर्चा मुंबईच्या दिशेने आगेकूच करेल, असे मराठा राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी सांगीतले. मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातून तसेच जिल्ह्यातून मराठा बांधव पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. सकाळी अकरा वाजता पंढरपूर येथील नामदेव पायरीचे दर्शन घेऊन या मोर्चाची सुरुवात होईल. मात्र शहरात मोठा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

09:55 November 07

पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात..

पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराजवळील रस्ते पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. नामदेव पायरी, आधार रोड प्रदक्षिणामार्ग, स्टेशन रोड, शिवाजी चौक, चंद्रभागा घाट याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. संचारबंदीमुळे पंढरपूर मधील मुख्य बाजारपेठ व्यापाऱ्यांकडून बंद ठेवण्याची शक्यता आहे. राज्य राखिव दलाच्या तुकड्याही शहरात तैनात करण्यात आल्या आहेत.

09:54 November 07

पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा..

मराठा क्रांती मोर्चाकडून पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा निघणार आहे. मराठा आरक्षणासाठी समाजातील युवकांनी बलिदान दिले आहे. हे मराठा समाजाचे आंदोलन राज्यभर चालू आहे. राज्य शासन व पोलीस प्रशासनाने मोर्चा थांबवीला तर त्याचे पडसाद राज्यभर उमटतील. व त्यास पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे महेश डोंगरे यांनी दिला.

09:52 November 07

मराठा आक्रोश मोर्चा : पंढरपुरात तणावाचे वातावरण..

पंढरपूर (सोलापूर)-आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या वतीने शनिवारी पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू करत परवानगी नाकारली आहे. पंढरपुरात मराठा आंदोलकांना मोर्चा काढण्यासाठी आणि जर आरक्षणाबाबत सरकार ठोस भूमिका स्पष्ट करणार असेल तर आंदोलन माघार घेण्यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासोबत बैठक झाली होती. मात्र, ती बैठक निष्फळ ठरली आहे. त्यानंतरही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आक्रोश मोर्चा काढण्याच्या निर्णय ठाम असून पंढरपुरातून मोर्चा निघणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

Last Updated : Nov 7, 2020, 1:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details