सोलापूर (अकलूज) : Manoj Jarange Patil : मंडल कमिशनला ओबीसींची जनगणना करा, असे सांगण्यात आले होते. मात्र, मंडल कमिशनने तसे केले नसल्याचे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले. चार वर्षांमध्ये ओबीसींची 60 टक्के लोकसंख्या कशी वाढली? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. मराठ्यांनो भानावर या, तुमचे मतभेद बाजूला ठेवा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठा समाज बांधवांना केले. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 ऑक्टोबर ही आरक्षणाची अंतिम तारीख दिली असून, त्याला आता केवळ तीनच दिवस उरले आहेत.
त्यामुळे त्यांना लाल दिवा मिळाला : सत्तेसाठी वर्षानुवर्ष ज्यांचे पटत नव्हते ते लोक एकत्रित आले आणि त्यातून त्यांना लाल दिवा मिळाला, अशी टिप्पणीही जरांगे पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर केली. सरकारला आता आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपण आता कोणीही मागे हटायचे नाही, असे आवाहन त्यांनी जाहीर सभेमध्ये बोलताना केले. फक्त तुमच्यामध्ये मतभेद होऊ देऊ नका, ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो. मराठा समाजाच्या पदरात आरक्षणाचं दान टाका, एवढीच विनंती तुम्हाला करण्यासाठी तुमच्या अकलूज शहरांमध्ये आलोय, असे भावनिक आवाहन जरांगे पाटील यांनी केले.