महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंगळवेढा तालुक्यात भालके, परिचारक अन् अवताडे गटाची कसोटी - मंगळवेढा ग्रामपंचायत बातमी

मंगळवेढा लुक्यामध्ये 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गावातील राजकारण ढवळून निघाले आहे. गावगाड्यांच्या राजकारणामध्ये भालके गट, अवताडे गट, परिचारक गट या गटांची तालुक्याच्या राजकारणावर मजबूत पकड आहे. या निवडणुकीत तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या गावांचा या आखाड्यात समावेश आहे. यामुळे तालुक्याच्या गावात कोरोना संकटात बिनविरोध होतात की निवडणुका लागतात, याकडे लक्ष लागले आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Jan 2, 2021, 8:17 PM IST

मंगळवेढा (सोलापूर) -तालुक्यामध्ये 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गावातील राजकारण ढवळून निघाले आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांच्यामुळे तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. गावगाड्यांच्या राजकारणामध्ये भालके गट, अवताडे गट, परिचारक गट या गटांची तालुक्याच्या राजकारणावर मजबूत पकड आहे. या निवडणुकीत तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या गावांचा या आखाड्यात समावेश आहे. यामुळे तालुक्याच्या गावात कोरोना संकटात बिनविरोध होतात की निवडणुका लागतात, याकडे लक्ष लागले आहे.

बोलताना संशोधक विद्यार्थी

अर्ज छाननीकडे उमेदवारांच्या नजरा

तालुक्‍यातील 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 894 उमेदवारांनी 910 अर्ज दाखल केले. सर्वाधिक उमेदवारी अर्ज मरवडे, बोराळेचे दाखल झाले. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत भोसे ग्रामपंचायतीसाठी पाच प्रभागातून 60 उमेदवारी अर्ज दाखल झाले. कायमस्वरूपी तालुक्‍यातील कोणत्याही राजकीय नेत्याचे आवाहन न स्वीकारता सलग 30 वर्षे मुढवी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परपंरा यावेळी कायम राहिली आहे. नामनिर्देशन पात्रतेची छाननी पूर्ण झाली आहे. यामूळे गाव गाड्यांमध्ये अर्ज माघारी घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. आता अर्ज छाननीत किती उमेदवारांचे अर्ज बाद होतात? याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायतीच्या विकासाच्या मुद्द्यावरुन निवडणूक

गावगाड्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीला अनन्य साधारण महत्व असते. मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायत निवडणुका लागल्या आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये विकासाच्या मुद्द्यावर ही ग्रामपंचायत लढवली जाण्याची शक्यता आहे. तालुक्यात रस्ते, पाणी, आरोग्य अशा मुद्द्यांवरून गावांमध्ये वनवा दिसून येतो. तालुक्याच्या राजकारणावर दिवंगत आमदार भारत भालके यांचे मोठे प्राबल्य होते. स्थानिक असण्याच्या मुद्द्यावरून आवताडे गटाचे वर्चस्व आहे. सहकार क्षेत्रात दबदबा असणाऱ्या परिचारक गटाचाही या भागावर प्रभाव आहे. यामुळे 23 ग्रामपंचायतीवर या गटाचा नक्कीच प्रभाव असणार आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून अवताडे व परिचारक गटाने प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच गावगाड्यातील गटातटाचे राजकारण प्रभावी ठरणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीवर पोटनिवडणुका अवलंबून

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनामुळे ही विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये या पोटनिवडणुकीचा मुद्दाही गाजताना दिसत आहे. पोटनिवडणुकीमुळे आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके, दामाजी सहकारी कारखान्याची चेअरमन समाधान आवताडे, युटोपियन शुगर कारखान्याचे आमदार प्रशांत परिचारक, शिवसेनेच्या नेत्या शैलेजा गोडसे यांनी मंगळवेढा तालुक्यातील लग्न समारंभ तसेच विविध कार्यक्रमांना हजेरी लावून आपली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच काही महिन्यांवर होणाऱ्या संत दामाजी कारखान्याची निवडणूकही या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर परिणाम कारक ठरणार आहे.

बिनविरोध निवडून येणाऱ्या ग्रामपंचायतींना मिळणार विकास निधी

नंदेश्वर ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल तर रुग्णवाहिका भेट देण्याची आमदार गोपीचंद पडळकर यांनी घोषणा केली आहे. चोखामेळा नगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुहास पवार यांनी 35 गावांच्या पाणी आंदोलनाच्या माध्यमातून राज्यात खळबळ उडविणारे सलगर बुद्रूक गाव जर बिनविरोध होत असेल तर एक लाख रुपये देण्यास तयार असल्याची घोषणा केली. उर्वरित चार दिवसांत गावगाड्यासह तालुक्‍यातील नेत्याला ग्रामपंचायती बिनविरोध करण्यास यश मिळेल का हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.

गावकारभाऱ्याकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू

तालुक्यात बहुतांश गावात दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तिरंगी व बिनविरोध निवडणूक करण्यासंदर्भात गावकारभारी उमेदवाराची मनधरणी करताना दिसून येत आहे. त्यामध्ये साम, दाम, दंड, भेद या सुत्रासह विकास सोसायटी, शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्त समिती, वन समिती, सरपंच, उपसरपंच विभागणी करून तर काही गावांमध्ये सदस्य विभागणी करून गावगाड्याच्या राजकारणातील बांधणी करून मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे

ग्रामपंचायत उमेदवारांची संख्या
मरवडे 74
लमाण तांडा 31
तांडोर 29
कात्राळ 21
आसबेवाडी 29
बोराळे 74
गणेशवाडी 37
डोणज 42
हुलजंती 71
महमदाबाद शे. 19
मल्लेवाडी 19
नंदेश्वर 67
लेंडवेचिंचाळे 42
लवंगी 31
अरळी 3
सलगर बुद्रूक 49
माचणूर 36
तामदर्डी 24
घरनिकी 18
भोसे 60
कचरेवाडी 38
मुढवी 0

हेही वाचा -सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला भाववाढ नाही; शेतकरी नाराज

हेही वाचा -अधिकारी असल्याची थाप मारुन केले लग्न, एक अटकेत

ABOUT THE AUTHOR

...view details