सोलापूर- माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील एका तरुणाने विवाहित प्रेयसीच्या मानसिक त्रासाला कंटाळून कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सचिन मधुकर पडळकर( वय 38) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सचिनने प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून अहमदनगर शहर सोडले होते, तरीही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची तिच्याकडून धमकी दिली जात होती. अखेर प्रेयसीच्या नेहमीच्या मानसिक त्रासाला कंटाळून प्रियकराने आपली जीवन यात्राच संपविली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सचिन पडळकर हा अहमदनगर येथे नोकरीस होता. तिथे तो आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. सचिनचे वडील अहमदनगर येथील एका कंपनीमध्ये नोकरीस होते. त्यांच्या मुत्यूनंतर वडिलांच्या जागी सचिन यास नोकरी लागली होती. नोकरीच्या ठिकाणी सचिनची एका विवाहित तरुणीबरोबर ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. काही महिन्यानंतर त्या विवाहित तरुणीने व तिच्या भावाने सचिनकडे पैशाचा तगादा लावला होता. यावर सचिनने त्यांना अडीच लाख रुपये दिले. मात्र त्यांच्याकडून सचिनला मानसिक त्रास सुरूच होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून सचिन अहमदनगर शहर व नोकरी सोडून मूळ गावी नातेपुते (माळशिरस) येथे राहावयास आला होता.