सोलापूर -सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सौरभ बारमधील मॅनेजर कैलास प्रभळकरचा 12 जुलै रोजी खून झाला होता. याप्रकरणी हॉटेलचा वस्ताद आकाश मंडल (रा. कोलकाता) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व तालुका पोलिसांनी सांगलीतील विटा परिसरातून अटक केली आहे. ही माहिती अपर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळजापूर रस्त्यालगत हगलूर शिवारात असलेल्या हॉटेल सौरभ बारमध्ये मॅनेजर म्हणून कैलास अप्पानाथ प्रभळकर हे गेल्या सहा वर्षापासून कामास होते. अनलॉक झाल्यापासून कैलास प्रभळकर हे हॉटेल सौरभमध्ये हॉटेलचे वस्ताद आकाश मंडल दोघे एकत्रित राहण्यास होते. 11 जुलै रोजी रात्री 10.30 ते 12 जुलै 2020 रोजी सकाळी 10.30 वा. सुमारास मॅनेजर प्रभळकरचा खून झाल्याची घटना घडली. हा खून वस्ताद आकाश मंडल याने केल्याचा आरोप आहे. प्रभळकर यांचा मुलगा आकाश प्रभळकरने (वय 27, धंदा - नोकरी रा. श्रीरामनगर शहीरवस्ती भवानीपेठ, सोलापूर) याने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली.
खूनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील संशयित आरोपी आकाश मंडल हा फरार झाला होता. आकाश मंडलच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडील कर्मचार्यांचे पथक मार्गस्थ झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण सावंत यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासाला गती देण्यात आली. गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी आकाश मंडल हा त्याचा भाऊ कुतबुद्दीन मंडल (रा.कदमवाडी वीटा जि.सांगली ) याच्याकडे वास्तव्यास असल्याचे कळाले.
पोलिसांच्या पथकाने विटा सांगली येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला. तेव्हा त्यास ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याने सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर प्रभळकर यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. खुनाच्या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी सल्लाउद्दीन उर्फ आकाश माणिक मंडल (वय 27 रा. सत सीमुलीया नाडीचा, नीमताळा बझार, पश्चिम बंगाल) यास अटक करून सोलापूर तालुका पोलिसांकडे देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली सपोफौ/ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, दिलीप राऊत, मोहन मनसावाले, केशव पवार, पांडुरंग केंद्रे व सचिन मागाडे यांच्या पथकाने बजावली.