सोलापूरMahiboob Shaikh Criticized BJP :राष्ट्रवादीचे प्रदेश युवक प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. बैठकीत आणि मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व स्थानिक नेते उपस्थित होते. महिबूब शेख यांनी भाषण करताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर देखील सडकून टीका केली. भारतीय संसदेत हुकूमशाही चालली आहे हे 141 खासदारांच्या निलंबनावरून लक्षात येत आहे, असं ते म्हणाले. (Mahiboob Sheikh criticizes Ajit Pawar group)
अशा नेत्याचा हिटलर सारखा मृत्यू होणार :भारतीय संसदेत 141 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. संसदेत बाहेरचे लोक येऊन गोंधळ करतात. संसदेमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत चर्चा करावी अशी मागणी खासदारांनी केली होती. सुरक्षेच्या प्रश्नावरून लोकसभेत गोंधळ झाला होता. लोकसभा अध्यक्षांनी 141 खासदारांना निलंबित केलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सातवेळा संसद रत्न पुरस्कार प्राप्त आहेत. दोनवेळा महासंसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांना देखील निलंबित केलं जातं ही लोकशाहीत शोकांतिका आहे. देशात एक प्रकारची हुकूमशाही निर्माण झाली आहे. हिटलरची चाल चालणाऱ्या नेत्याचा मृत्यू देखील हिटलर सारखा होणार, अशी अप्रत्यक्ष टीका महिबूब शेख यांनी केली आहे.