सोलापूरMaharashtra Kesari: मूळचा सोलापूरचा असलेल्या सिकंदर शेख याची मोहोळमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली. महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्या नंतर पहिल्यांदाच सिकंदर शेख जन्मभूमीत आला होता. रविवारी सकाळी सिकंदर शेखची ग्रामस्थांनी थाटामाटात मिरवणूक काढली. सिकंदर शेखला गरिबीत मदत करणारे रमेश बारस्कर (Ramesh Baraskar) यांनी हत्ती आणला होता. मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांनी तीन वर्षांपूर्वी सातारा येथे सिकंदरला शब्द दिला होता. सिकंदर तू 'महाराष्ट्र केसरी' (Maharashtra Kesari) झाला तर तुझी मोहोळमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढली जाईल. तो क्षण आज आला आणि त्याचं मला खूप आनंद झाला आहे, असं सिकंदरने माध्यमांना बोलताना सांगितलं.
भविष्यात डीवायएसपी, हिंद केसरी होणार: रमेश बारस्कर यांनी मोहोळमध्ये सिकंदर शेखचा जाहीर सत्कार केला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने माध्यमांसमोर मनातील सर्व इच्छा व्यक्त केल्या. भविष्यात हिंद केसरी, ऑलम्पिक आणि डीवायएसपी होणार आहे. जानेवारी महिन्यात उपांत्यफेरीत पंचाच्या निर्णयामुळं मला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं. परंतु, त्यावेळी मी सर्व महाराष्ट्र राज्यातील कुस्तीप्रेमींना, माझ्या चाहत्यांना, तसेच सोलापूरकरांना शब्द दिला होता. महाराष्ट्र केसरी बनून राहणार, तो शब्द आज पूर्ण केला आहे. महाराष्ट्र शासनाने किंवा मुख्यमंत्र्यांनी मला डीवायएसपीची शासकीय नोकरी द्यावी, कारण मला देखील खाकीची आवड आहे. मी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळून मेडल आणणार असं सिकंदरने सांगितलं.