माढा (सोलापूर)- कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. लोकांनी स्वत:ची काळजी घ्यावी घरात बसुन लाॅकडाऊनचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिक जर अशा प्रकारे बेजबाबदारपणे वागत राहिले तर कोरोना अनियंत्रित होऊन यापुढील काळात रुग्णालयातुन लोकांचे मुडदे बाहेर पडतील, अशी भीती व्यक्त करत माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी नागरिकांना सल्ला दिला आहे.
यावेळी खासदार निंबाळकर यांनी उजनीच्या पाण्यावरूनही सत्ताधारी आणि बारामतीकरांवर निशाणा साधला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा खासदार निंबाळकर यांनी आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतशी सवांद साधला.
निंबाळकर म्हणाले, सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यभरात तुटवडा आहे. जिल्ह्यातील इंजेक्शन तुटवडा प्रश्नी मी सोलापुर जिल्हाधिकारी यांना बोललो आहे. सध्या कडकडीत लाॅकडाऊनसह नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करणे तितकेच गरजेचे आहे.
उजनीच्या पाण्यावरून वाद
पालकमंत्री दत्ता भरणे यांनी उजनी धरणातून इंदापूरला ५ टीएमसी पाणी नेल्याचा जो विषय आहे. त्या विषयाचा संपुर्ण प्रस्ताव मी वाचला आहे. मात्र तो प्रकार म्हणजे स्थिरीकरणाच्या नावावर बारामती लोकसभेचे स्थिरीकरण करण्याचा घातलेला नवीन घाट आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.