पंढरपूर (सोलापूर) -थकवा घालवण्यासाठी सर्वजण विश्रांतीसाठी निसर्गरम्य ठिकाणाचा शोधात असतात. त्याचप्रमाणे पंढरपुरचा विठुरायाच्या पंढरीतील आपले मंदिर सोडून महिन्याभराच्या सुटीवर असतो. मागील शेकडो वर्षांपासून विठूराया दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील विष्णूपद मंदिरात वास्तव्यास असतो, अशी आख्यायिका आहे.
चंद्रभागा नदी पात्रातील विष्णूपद मंदिराचा इतिहास
पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूरजवळ चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरास विष्णूपद म्हणून ओळखले जाते. यामागे पद्म पुराणात अख्यायिका सांगितली जाते. जेव्हा रुक्मिणी देवी देवावर रुसून दिंडीर वनात आली. तेव्हा देवीच्या शोधात विठ्ठल ज्या ठिकाणी पंढरपुरात प्रथम आले, ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक म्हणजेच विष्णूपद. या ठिकाणी एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहूडाचरण म्हणजेच पाऊले उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची आणि काल्याच्या वाडग्याची खूण आहे. या शिळेवर दगडी मंडप उभारला आहे. येथील खांबावर चतुर्भुज समचरण विष्णूमूर्ती आणि देहूडाचरण मुरलीधराची मूर्ती कोरली आहे. विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्याने इथे उमटलेल्या पावलांमुळे या चंद्रभागेच्या पाण्यातील खडकावरील ठिकाणास विष्णूपद, असे नाव मिळाले.
विठुरायाची नित्यपूजा विष्णूपद मंदिरात