सोलापूर - सोलापूर शहरातील बहुतेक बाजार पेठातील सर्वच प्रकारची दुकाने शुक्रवारपासून सुरू झाली आहेत. पालिका प्रशासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे नियम लावून केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली होती. तब्बल दोन महिन्यानंतर शुक्रवारपासून दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आज (शुक्रवारी) सकाळपासून सोलापुरातील बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ दिसून आली. काही दुकानधारकांनी दोन महिन्यानंतर साफ सफाईचे काम करताना दिसून आले, तर काही दुकानांत विविध वस्तूची विक्री सुरू होती. बाजारपेठेतील व्यपारी वर्गात आनंदाचे वातावरण पहायला मिळाले.
सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने सोमवार ते शुक्रवार असे म्हणत आठवड्यातून पाच दिवस शहरातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या दुकानधारकांना वेळ देण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवार फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली आहे. राज्यातील बहुतांश शहरात लॉकडाऊनच्या नियमावलीत शिथिलता देण्यात आली होती. मात्र लोकसंख्येच्या जुन्या निकषामुळे सोलापुरातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत लागू करण्यात आले होते. त्यामुळे तीन दिवस उशीरा सोलापुरातील बाजारपेठ खुली झाली आहे.