बार्शीत लॉकडाऊन : स्थानिक प्रशासनाच्या निर्णयावरून बंद - १० days strict lockdown
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एक ना अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, रुग्णसंख्या ही वाढतच आहे. बार्शी शहरासह तालुक्यात रुग्ण संख्या वाढत असून वेळेत उपचार करणेही मुश्किल होत असल्याने आता बार्शी तालुक्यात बुधवारपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन केले जाणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या आणि प्रशासनाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूर - जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. शिवाय मृत्यू दरही वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. बार्शी तालुक्यातील वैराग, पांगरी, आगळगाव, चिखर्डे या तालुक्याच्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. असे असतानाही 500 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे उपचारासाठी आवश्यक असलेल्या साधनसमुग्रीचा तुटवडा भासत आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये केवळ 5 रेमडेसीवीर इंजेक्शन मिळाले आहेत तर लसीचाही तुटवडा भासत आहे. वेळेत उपचार होत नसल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे 10 दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. केवळ मेडिकल आणि नियमित वेळी भाजीपाला विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. इतर आस्थापना बंद राहणार असून इतर जिल्ह्यातील नागरिकांनाही प्रवेश बंदी राहणार आहे. बंदच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र राऊत यांनी आढावा घेतला होता. शहरासह ग्रामीण भागातही संख्या वाढत असल्याने कडक निर्बंधचा निर्णय घेण्यात आला आहे.