सोलापूर (पंढरपूर) -गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीमुळे ग्रामीण भागात असलेल्या कलावंतांची उपासमार सुरू आहे. पंढरपूर शहर व तालुक्यातील लोककलावंतांनी कला सादर करून अनोख्या पद्धतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. सरकारी नियमांचे पालन करून राज्यातील कलावंतांना कार्यक्रम करण्यास परवानगी मिळावी, अशी कलावंतांची मागणी आहे.
लोककलावंतांनी 'असे' केले अनोखे आंदोलन; कार्यक्रमाची परवागनी देण्याची मागणी - local artists issue in Pandharpur
लोककलांवतांना कार्यक्रम करण्याची परवानगी मिळत नसल्याने त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी पंढपुरात केलेले आंदोलन चर्चेचा विषय ठरत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी आहे. त्यामुळे अनेक लोककलांवत आर्थिक अडचणीत आले आहेत. अनेक लोककलाकारांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपआपल्या कला सादर करून तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला. शहर व तालुक्यातील लोक कलाकार, बॅन्ड पार्टी कलाकारांनी कलांचे सादरीकरण केले. लोककलावंतांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा निर्धार गणेश गोडबोले यांनी याप्रसंगी व्यक्त केला. उद्धवा अजब तुझे सरकार... असे म्हणत एकतारी भजनी कलाकार, शाहीर व वाघ्यामुरळी कलावंतानी कला सादर करत अनोखो आंदोलन केले.
स्वरांजली ग्रुपचे संस्थापक, कलाकार गणेश गोडबोले यांनी लोककलावंताच्या मागण्यांसाठी आजपासून तहसील कचेरीसमोर आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बॅन्डवाले, गायक, वादक, मंडप व्यावसायिकांसह अनेक जणांनी हजेरी लावली. उपोषणाला पाठींबा देण्यासाठी भारुडकार चंदाताई तिवाडी, प्रसिध्द गायक दिलीप टोमके हे उपस्थित राहिले. तसेच महाराष्ट्र राज्य वाघ्यामुरळी परिषदेचे शाहीर सुभाष गोरे, सुयोग कलामंचचे रविंद्र शेवडे, अखिल भारतीय शाहीर परिषदेचे विजयकुमार व्यवहारे, परशुराम पवार, शाहीर नंदकुमार पाटोळे, विनय महाराज बडवे, अरुण जोशी, वैभव जोशी उपस्थित राहिले. त्याचबरोबर साउंड मंडप असोसिएशनचे अध्यक्ष भगवानराव मनमाडकर, डॉ. प्राजक्ता बेणारे, नाट्य परिषदेचे राजभाऊ उराडे, बाळासाहेब गोडबोले व पार्थ बेणारे यांनी आंदोलनाला उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दिला. अनोख्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाची पंढपूर शहरात चर्चा सुरू आहे.