पंढरपूर (सोलापूर) -गेल्या चार-पाच दिवसांपासून करमाळा तालुक्यात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. बिबट्याच्या अंजनडोह गावात केलेल्या हल्ल्यात जयश्री दयानंद शिंदे (वय. 26) या महिलेला ठार केले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात तालुक्यात दुसरा बळी गेला आहे.
करमाळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका तरुण व महिलेला जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी 3 डिसेंबरला कल्याण देविदास फुंदे (रा. लिंबेवाडी) याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचे बळी गेल्याने करमाळा तालुक्यात घबरावटीचे वातावरण तयार झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी बीड, सोलापूर व अहमदनगर वनखात्याच्या टीमसह करमाळा पोलीस सज्ज सज्ज झाले आहेत. करमाळा तालुक्यातील नागरिकांना पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी काळजी घेण्यासह महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
बिबट्या आष्टी व जामखेड तालुक्यातून लिंबेवाडी गावाकडे आला असण्याची शक्यता आहे. कारण आष्टी व परिसरात या बिबट्याने सात-आठ लोकांवर हल्ला केला आहे. लिंबेवाडी येथे नवव्या व्यक्तीवर हल्ला केला आहे. त्यानंतर अंजनडोह गावात बिबट्याने महिलेवर हल्ला करून ठार केले आहे. हा हल्ला केलेला बिबट्या हा नरभक्षक असण्याची जास्त शक्यता आहे. बिबट्या नरभक्षक असण्याची जास्त शक्यता असल्याने सर्व नागरिकांनी अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. वन विभागाकडून अहमदनगर, बीड, सोलापूर वन कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे.