सोलापूर - करमाळा तालुक्यातील चिकलठाणा येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या कामागाराच्या मुलीचा गळा बिबट्याने जबड्यात पकडला. यानंतर तिला फरफटत नेले. या दुर्घटनेत संबंधित मुलीचा मृत्यू झाला आहे. फुलाबाई हरीचंद कोठले(वय 8 वर्ष) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. ही सलग तिसरी घटना असून या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग आक्रमक पावलं उचलत आहे. या घटनेमुळे करमाळ्यात बिबट्याची दहशत पसरली आहे.
खेळत असलेल्या चिमुरडीला बिबट्याने ओढत नेले
फुलाबाई कोठले ही आठ वर्षांची मुलगी शेतात खेळत होती. आई-वडिल ऊस तोडणी करत होते. यावेळी नरभक्षक बिबट्याने केळीच्या शेतातून हल्ला केला. चिमुरडीच्या गळ्याला पकडून त्याने ओढण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज सोमवारी सकाळी घडली. उपस्थितांनी आरडाओरड करत बिबट्याला पिटाळून लावले. परंतु तोपर्यंत बिबट्याने मुलीला गंभीर जखमी केले होते.