सोलापूर-आषाढी वारीचे वारकऱ्यांसह सगळ्या राज्याला वेध लागले आहे. याच आषाढी सोहळ्यानिमित्त पुणे येथील विनोद जाधव या भाविकाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मंदिर परिसरांसह शिखरांना २ लाख दिव्यांच्या आकर्षक विद्युत रोषणाईने उजळवून टाकले आहे. मूळचे मुळशी तालुक्यातील असलेल्या विनोद जाधव यांचा डेकोरेशनचा मोठा व्यवसाय आहे. त्यांना विठ्ठल मंदिराला विद्युत रोषणाई करण्याची खूप वर्षांपासूनची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे.
विठ्ठल मंदिरावर चढली विद्युत रोषणाईची झळाळी, २ लाख एलईडी बल्बचा वापर - विद्युत रोषणाई
आषाढी सोहळ्यानिमित्त पुणे येथील विनोद जाधव या भाविकाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मंदिर परिसरांसह शिखरांना २ लाख दिव्यांच्या आकर्षक विद्युत रोषणाईने उजळवून टाकले आहे.
या वर्षी पहिल्यांदाच विठ्ठल मंदिराच्या आतील बाजूस देखील आकर्षक पद्धतीने उंची झुंबर, पडदे लावत चक्क मंदिराला राजवाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे. विठ्ठल मंदिराचे महाद्वार, रुक्मिणी द्वार, पश्चिम द्वार या प्रमुख प्रवेशांच्या ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्याशिवाय संपूर्ण मंदिर परिसर, तुकाराम भवन, दर्शन मंडपदेखील या रोषणाईने उजळून गेला आहे.
मंदिराच्या आतील बाजूसदेखील आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. विठ्ठल सभामंडप या आकर्षक रोषणाईने झगमगू लागला आहे. नामदेव पायरीजवळ देखील आकर्षक एलईडी दिव्यांच्या माळा वापरुन रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराची शिखरे आणि मंदिरावर विविध रंगांच्या दिव्यांचे फोकस मारण्यात आल्याने विठ्ठल मंदिराचे रुपडेच पालटले आहे. तसेच विविध ठिकाणी आकर्षक आणि रंगीत केलेल्या रोषणाईत लहान मोठे चमकणारे २ लाख छोटे-मोठे दिवे लावले आहेत. या २ लाख दिव्यांच्या माध्यमातून विविध हालचाली ने नयनरम्य इफेक्ट केले आहेत. यामुळे यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी विठ्ठल मंदिरातील ही विद्युत रोषणाई प्रमुख आकर्षण ठरणार आहे.