पंढरपूर(सोलापूर)- वाळवा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रवीकिरण माने यांच्या कुटुंबावर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत याने हल्ला केल्याचा प्रकार घडला. या हल्ल्याचा सोलापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. सागर खोत यांनी माने यांच्या कुटुंबावर हल्ला करून चळवळीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी दिला आहे.
स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांकडून हल्ल्याचा जाहीर निषेध
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर सोशल मीडियावरून टीका केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी वाळवा तालुकाध्यक्ष रविकिरण माने यांना घरात घुसून मारहाण झाली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सागर खोतसह चौघांवर कासेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा पंढरपूर तालुका स्वाभिमानी संघटनेकडून निषेध व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.