सोलापूर- जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती मुंबईतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने ठोंगे-पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः ही कारवाई केली आहे.
माजी पुनर्वसन मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या मंत्रिपदासाठी पक्षांतर्गत दबावाचा प्रयत्न केल्याचा, तसेच शिवसेना विरोधी कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे. तानाजी सावंत यांच्या शिवसेना प्रवेशानंतर उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात शिवेसेनेला गटबाजीचे ग्रहण लागले. सावंत यांनी पक्षात स्वतःची एक स्वतंत्र फळी तयार केली. त्यावेळी त्यांच्यावर सावंतसेना निर्माण केल्याचा आरोप होत होता. शिवाय राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर त्यांनी दबाव तंत्राचा वापर केला. त्यामुळे दबाव तंत्राच्या राजकारणाचा एक प्यादा असणाऱ्या जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला.