सोलापूर : Lathicharge in Jalna : सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर शहरातील मुख्य चौकात जालना येथील घटनेचा निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला. पोलीस दलाने जालना येथील मराठा आरक्षणासाठी बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करून मोठी चूक केली आहे. याचे परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
मराठा समाज आक्रमक : सकल मराठा समाजाचे समनव्यक माऊली पवार यांनी जालना येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. राज्य सरकार मधील प्रमुख तीन मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला आहे. मराठा समाजाला जोपर्यंत ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज आंदोलन करत राहणार. यानी एकाही मराठा कार्यकर्त्यांच्या केसाला देखील धक्का लागला तर, महाराष्ट्र राज्य पेटून उठेल असा इशारा दिला आहे.
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज: जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांनी काही सहकाऱ्यांसह उपोषण 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू सुरू केले. मात्र, मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर मनोज जरंगे यांना उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र त्यांनी आपलं उपोषण सोडले नाही. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. पोलिसांनी बळाचा वापर करण्याची गरज नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शांततेचे आवाहन केले आहे.