सोलापूर -अक्कलकोट, सोलापूर महामार्गासाठी हजारो एकर शेतजमिनी भूसंपादन केल्या आहेत. पण त्याचा मोबदला आज देखील अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्याबाबत अनेक शेतकरी हे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा भूसंपादन कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. शासन आज नाही तर उद्या आपल्याला मोबदला देईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
गेल्या दोन वर्षापासून अक्कलकोट सोलापूर महामार्गावरील शेतकरी हे भूसंपादन कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. यांच्या हजारो एकर शेतजमीनी या महामार्ग विकास प्राधिकरणाने संपादित केल्या आहेत. पण त्याचा मोबदला मात्र लवकर मिळत नसल्याने फक्त हेलपाटे मारण्याचे नशीबात आल्याचे शेतकरी सांगतात.
महामार्गावरील व्यवसायिक मात्र हवालदिल-
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, ग्रील या कंपनीने महामार्गाचे काम सुरू केले. तसेच महामार्गावरील व्यवसायिकांना व्यवसायापासून वंचित केले आहे. अक्कलकोट सोलापूर महामार्गावरील वळसांग गावालगत असलेल्या फेरीवाल्यांना व हातगाडीवर फळं विक्रेत्यांना याचा जबर फटका बसला आहे. हे व्यवसायिक हवालदिल झाले आहेत.
ग्रील कंपनीचा भोंगळ कारभार-
अक्कलकोट सोलापूर हा रस्ता चार पदरी होत आहे. सर्व्हिस रोडसह सहा पदरी मार्ग होत आहे. याचा मक्ता राजस्थान येथील ग्रील या कंपनीला मिळाला आहे. अनेक गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी या कंपनी विरोधात तक्रारींचा पाढा मांडला होता. या कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी व व्यवसायिक यांना यातना सहन कराव्या लागत आहे. कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्रीवास्तव यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. त्यांचाशी संपर्क झाला नाही. त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी देखील माहिती देण्यास टाळाटाळ केली. यामुळे या महामार्ग विकासात काही तरी गैरप्रकार होत असल्याचा संशय निर्माण होत आहे.