सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. 21 ऑगस्टपासून ही सेवा सुरु होणार आहे. कोल्हापूर ते मनमाड पर्यंत ही किसान रेल्वे लिंक एक्सप्रेसचा धावणार आहे. देवळाली येथून सुटणाऱ्या किसान रेल्वेला कोल्हापूर येथून सुटणारी लिंक एक्सप्रेस मनमाड स्थानकात जोडली जाईल. देवळाली येथून सुटणारी किसान रेल्वे बिहारमधील मुजफ्फरपूरपर्यंत जाते, अशी माहिती सोलापूर विभागातील सिनिअर डिव्हिजनल कम्रशियल मॅनेजर प्रदीप हिरडे यांनी सांगितले.
21 ऑगस्टपासून नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी सोलापूर मध्य रेल्वे विभागात किसान रेल्वेचा प्रारंभ होणार आहे. सोलापूर व पूणे विभागातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर परिसरात डाळिंब, केळी, द्राक्षे आदी फळे भाजीपाला, फुले, कांदे, अशा शेतमालाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. शेतकऱ्यांना पिकवलेले उत्पादन इतर जिल्हयात पाठवण्यासाठी मोठा खर्च येतो. हा शेतमाल रेल्वेने पाठवल्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. त्या अनुषंगाने किसान रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे.