सोलापूर -किरीट सोमैया आता कोल्हापूर येथे येऊ शकतात. गेल्यावेळी कोल्हापूरकडे येताना त्यांचा डिटेल दौरा उपलब्ध नव्हता. म्हणून कोल्हापूरच्या स्थानिक प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी त्यांच्या येण्यावर बंदी घातली होती. मात्र, त्यानंतर हसन मुश्रीफ यांनीदेखील किरीट सोमैया यांच्या कोल्हापूर दौऱ्याला हिरवा कंदील दाखवला आहे, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिली आहे. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांचे सोलापूर शहरातील संपर्क कार्यालयाचे उदघाटन झाले. उद्घाटन सोहळा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
'तीन सदस्यीय प्रभाग पद्धती ऍडजस्टमेंटसाठी' -
मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणूक या तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहेत. यावर गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले की, 'तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे ऍडजस्टमेंट करता येते. एखादा चांगला कार्यकर्ता असेल आणि प्रभाग बदलला, तर त्याचे राजकीय करिअर संपत होते. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे पक्षीय बळ याठिकाणी येणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.