करमाळा(सोलापूर) - करमाळा शहरातील पुरातन काळातील खोलेश्वर महादेवाचे मंदिर इतिहासात प्रथमच पवित्र श्रावण महिन्यातही भाविकांसाठी बंद आहे. कोरोनामुळे श्रावण महिन्यातसुद्धा महादेवाची दररोजची आरती पुजाऱ्यासह चार भाविक डिस्टन्सिंग पाळून करतात.
कोरोनामुळे काल ( तिसऱ्या सोमवारी) दरवर्षीप्रमाणे खोलेश्वर महादेवाच्या रथाची मिरवणूक शहरातून न काढता रथात खोलेश्वराची मूर्ती बसवून मंदिर परिसरात फक्त पाच ते दहा पावले रथ ओढून काढण्यात आली. याप्रसंगी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते रथाची महापूजा करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, याची काळजी घेत प्रशासनाने गेल्या चार महिन्यांपासून मंदिरे, मशीद, दर्गाह, चर्च सर्वच धार्मिक व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद केली आहेत. पवित्र श्रावण मासात महादेव मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिरात नामजप, पारायण, सप्ताहाचे आयोजन करतात. संपूर्ण मंदिर व परिसराचे वातावरण भक्तिमय होते. पण यंदाचा श्रावण मास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी निराशा व चिंता देणारा ठरला आहे.
ऐतिहासिक भूईकोट किल्ल्यात खोलेश्वर महादेवाचे अहमदनगरच्या निजामशाहीतील सरदार राजेरावरभा निंबाळकर यांनी बांधलेले आहे. मंदिर पुरातन असल्याने श्रावणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. पण कोरोनामुळे प्रशासनाने मंदिर दर्शनासाठी बंद केल्याने भाविकांना खोलेश्वराचे दर्शन बाहेरूनच घ्यावे लागत आहे.
कोरोनामुळे काल (ता.१०) तिसऱ्या सोमवारी दरवर्षीप्रमाणे खोलेश्वर महादेवाच्या रथाची मिरवणूक शहरातून न काढता रथात खोलेश्वराची मूर्ती बसवून मंदिर परिसरात फक्त पाच ते दहा पावले रथ ओढून काढण्यात आली. यावेळी भाविक उपस्थित होते.
नागेश काळे (गुरव) म्हणाले, की श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी खोलेश्वर महादेवाच्या रथाची मिरवणुक शहरातून काढली जाते. शहरातील वडार समाजाचे बांधव हा रथ ओढतात व सुतार समाज बांधवांना रथात बसण्याचा बहूमान, अशी परंपरा जोपासली जाते, परंतु यावर्षी कोरोनामुळे अनेक वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे. परंतु आम्ही सोशल डिस्टन्स पाळून दरवर्षीप्रमाणे खोलेश्वर महादेवाच्या रथाची मिरवणूक शहरातून न काढता रथात खोलेश्वराची मूर्ती बसवून मंदिर परिसरात फक्त पाच ते दहा पावले रथ ओढून परंपरा जोपासली आहे.