सोलापूर (पंढरपूर)Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी यात्रा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे. 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशीचा सोहळा पंढरपूरमध्ये होत आहे. कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी प्रशासनही तयारीला लागलं आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनीही बैठका घेत, योग्य त्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. परंपरेनुसार आषाढी एकादशी शासकीय महापूजा ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री करत असतात. राज्यात यंदा प्रथमच दोन उपमुख्यमंत्री असल्याने, कार्तिकी एकादशीच्या महापूजेला कोणाला बोलवावं यासंदर्भातली मंदिरे समितीची बैठक आज भक्त निवास येथे झाली.
मराठा समाजाच्या वतीनं दिलं निवेदन : मंदिर समितीच्या वतीनं शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात येत असतं. त्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यासाठी मंदिर समितीची बैठक झाली. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह मंदिर समितीचे सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं उपमुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेसाठी निमंत्रण देऊ नये असं निवेदन देण्यात आलं.
राजकीय नेत्यांना गावबंदी :राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आंदोलनं सुरू होती. अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांनी 25 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्या उपोषणाला पाठिंबा देत राज्यातील अनेक गावांतून साखळी उपोषण सुरू होतं. त्या साखळी उपोषणाच्या माध्यमातून मराठा आरक्षण प्रश्न निकालात निघत नाही, तोपर्यंत सर्वच लोकप्रतिनिधींना व राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचे फलक लावण्यात आले होते. परिणामी दोन नोव्हेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या आश्वासन दिल्यानंतर सुरू असलेलं अमरण उपोषण मागे घेण्यात आलं होतं.
विधि व न्याय विभागाकडे मागणार सल्ला : मराठा आरक्षणाची शेवटची तारीख ही दोन जानेवारी दिल्यानं आंदोलन शांत झालं होतं. मात्र पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना तसेच इतर कोणत्याही लोकप्रतिनिधींना पंढरपूर मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आल्यानं, त्याचा अहवाल मंदिर समिती शासनाकडे पाठवणार आहे. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पूजेला कोणाला बोलवायचं यासाठीचा निर्णय विधि व न्याय विभागाकडे मागणार असल्याचेही मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- Ashadhi Wari 2023 : चंद्रभागेच्या तिरी लाखो भाविकांची गर्दी, भाविकांच्या गर्दीने फुलली विठ्ठू नगरी
- Ashadhi Ekadashi : आधी नंदापुरी मग पंढरपुरी; आषाढीसाठी कोल्हापूरातील प्रतिपंढरपूर नंदवाळ सज्ज
- Ashadhi Ekadashi 2023: अनोखी भक्ती, विठुरायाच्या भक्तांनी प्रसादासाठी तयार केले 72 हजार लाडू