सोलापूर (पंढरपूर) Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असते. मात्र, यावर्षी दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकी यात्रेनिमित्त नेमके कोणाला बोलवायचं आणि सकल मराठा समाजाने या शासकीय महापूजेला विरोध केल्यानं पेच निर्माण झाला होता. जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून समाजाच्या पाचही मागण्या मान्य केल्यानं मराठा समाजाने आंदोलन मागे घेतलं आहे. 23 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिकी यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (Kumar Ashirwad) यांनी पंढरपूर येथे दिली.
पाचही मागण्या तत्काळ मान्य केल्या : पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासन व सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव तसेच सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी कुणबी जातीच्या नोंदी वेगाने शोधणे, मराठा भवन बांधणे, सारथीचे उपकेंद्र सुरू करणे, मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधणे आणि मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचा वेळ मिळवणे या मागण्या करण्यात आल्या. त्यावर जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मराठा समाजाने केलेल्या उपरोक्त पाचही मागण्या तात्काळ मान्य केल्या आहेत. प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री यांना शासकीय महापूजा करण्यास केलेला विरोध आणि आंदोलन मागे घेतलं आहे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री हे कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यास कोणतीही हरकत नसल्याचं, समाजाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.