सोलापूर : कर्नाटक राज्यात विधानसभेसाठी १० मेला मतदान होणार असून १३ मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या राज्याची विधानसभा आपल्याकडे राहावी, यासाठी भाजपने जोरात दंड थोपटले आहेत. तर कर्नाटकात परत एकदा पंजाची ताकद दिसावी म्हणून काँग्रेसनेही मोठी टक्कर दिली आहे. निवडणुकीचा प्रचार अजून चालू आहे. याचदरम्यान राजकारणातील चाणक्य म्हणजेच राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर विजयाचा गुलाल उधळला आहे.
तीन दिवसांनी परत घेतला राजीनामा: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट करण्याचा विचार शरद पवार यांनी केला आहे. परंतु त्यांच्या राजीनाम्यामुळे विरोध एकजूट होण्याच्या प्रयत्नावर पाणी फिरणार होते. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील नेतेदेखील राजीनामा मागे घेण्यासाठी विनंती करत होते. राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांनी तीन दिवसाता राजीनामा मागे घेतला.
भाजपची चिंता वाढली : शरद पवार यांनी नुकताच अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला आहे. यामुळे २०२४ लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षांची एकजूट होण्याची शक्यता आहे. दरम्यान लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाला विरोध केल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला आहे. त्यानंतर शरद पवार यांनी भाजपची चिंता वाढवणारी भविष्यवाणी केली आहे.
भाजपा नेत्यांनी देव पाण्यात ठेवले :शरद पवार यांनी राजीनामा परत घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी राजीनामा मागे घेऊ नये. पक्षाच्या उच्चस्तरीय समितीने त्यांचा राजीनामा स्वीकारावा, यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले होते. याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले असताना शरद पवार म्हणाले, हे भाजपाच्या नेत्यांशिवाय दुसरे कोण असेल. त्यांना मी राजीनामा द्यावा असे वाटतं.
कर्नाटकात काँग्रेस येणार सत्तेत :दरम्यान, राजकारणात ज्यांना चाणक्य म्हटले जाते त्यांनी म्हणजेच शरद पवार यांनी कर्नाटकात भाजपचे पानीपत होणार असल्याचे भाकित केले आहे. कर्नाटकात काँग्रेस सत्तेत येणार असल्याची भविष्यवाणी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे केली. पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपची सत्ता फक्त पाच ते सहा राज्यात आहे. तर उर्वरीत राज्यात इतर पक्षांची सत्ता आहे. माझ्या सूत्रांनुसार, कर्नाटकात काँग्रेस सत्तेत येणार आहे.