मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली घरघर थांबायचे नाव घेत नाही. राष्ट्रवादीला पुन्हा एक दणका बसला आहे. करमाळा मतदार संघाच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनी मुंबईत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
राष्ट्रवादीला पुन्हा एक दणका! रश्मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेश रश्मी बागल माजी मंत्री दिगंबर बागल यांच्या कन्या असून त्यांची आई शामल बागल यादेखील माजी आमदार होत्या. यामुळे करमाळा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले, "पक्ष बांधणीसाठी नाही तर पक्ष बळकटीसाठी सर्वांनी मिळून काम करा. करमाळ्यात जो भगवा फडकत आहे, तो अधिक मजबुतीने डौलावा अशी अपेक्षा आहे."
रश्मी बागल यांच्याबद्दल -
माजी मंत्री दिगंबरराव बागल यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या जागी रश्मी बागल यांच्या मातोश्री शामल बागल यांना राष्ट्रवादीने तिकीट देत २००९ मध्ये आमदार केले. दिगंबरराव बागल यांनी यांनी शरद पवारांच्या मंत्रिमंडळातही काम केले होते. करमाळा विधानसभेला २००९ मध्ये माढा तालुक्यातील ३६ गावे जोडली. राष्ट्रवादीने २०१४ च्या निवडणुकीत रश्मी बागल यांना उमेदवारी दिली. पण अवघ्या २४९ मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात बँकेच्या संचालक म्हणून पक्षाने त्यांना बढती दिली. सध्या रश्मी बागल यांच्याकडे मकाई आणि आदिनाथ साखर कारखाने तसंच करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. दिगंबरराव बागल यांच्या राजकीय वारस म्हणून त्या राजकारणात वावरत आहेत. रश्मी बागल या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी मानल्या जातात. आदिनाथ आणि मकाई या साखर कारखान्यावर त्यांची सत्ता आहे.