सोलापूर - कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणी राज्याचे मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले. महारयत अॅग्रो कंपनीच्या वतीने सोलापुरातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यासंदर्भात सोलापुरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदनही दिले आहे.
सदाभाऊ खोतांच्या नातेवाईकांवर कारवाई करा कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायातून लाखो रुपयांचे उत्पन्न प्राप्त करुन देतो, अशी बतावणी करीत महारयत अॅग्रो कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कंपनीने शेतकऱ्यांकडून लाखो रुपये घेऊन शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडीची पिल्ले दिली. तसेच शेतकऱ्यांसोबत करार करून अंडी आणि कोंबड्या घेण्याची हमी दिली. मात्र शेतकऱ्यांकडून लाखो रुपये घेऊन देखील शेतकऱ्यांकडील कडकनाथ कोंबडीचे अंडी खरेदी न करता ही कंपनी पैसे घेऊन पसार झाली.
हेही वाचा - ...तर भर चौकात सहकुटुंब फाशी घेऊ - कृषी राज्यमंत्री खोत
महारयत अॅग्रो कंपनीचे मालक हे मंत्री सदाभाऊ खोत यांचे नातेवाईक आहेत. या कंपनीने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संपूर्ण राज्यात कडकनाथ कोंबडीच्या नावाखाली जवळपास 500 कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचा आरोप वंचित आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे व शेतकऱ्यांनी केला.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकासह, सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांवरही गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच सदाभाऊ खोत यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली आहे. कडकनाथ कोंबडी प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार द्यायला गेले असता पोलीस तक्रार घेत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी यावेळी केला.