महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फलोत्पादन योजनांसाठी निधीत वाढ - जयदत्त क्षीरसागर - आषाढी एकादशी

मंत्री जयदत्त क्षिरसागर यांच्या हस्ते भंडीशेगांव येथे फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथांचे गुरूवारी उदघाटन करण्यात आले.

फलोत्पादन योजनांसाठी निधीत वाढ - जयदत्त क्षीरसागर

By

Published : Jul 13, 2019, 3:58 AM IST

सोलापूर- पारंपरिक शेती बरोबरच फलोत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळायला हवे. फलोत्पादनामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावतो. त्यामुळे फलोत्पादनाच्या योजनांसाठी निधीत वाढ केली जात आहे, असे फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षिरसागर यांनी पंढरपूरात सांगितले.

मंत्री जयदत्त क्षिरसागर यांच्या हस्ते भंडीशेगांव येथे फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथांचे गुरूवारी उदघाटन करण्यात आले. आषाढी एकादशीला राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या वारकऱ्यांपर्यंत फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांची माहिती पोहचविण्यासाठी या चित्ररथांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी क्षिरसागर म्हणाले, मागेल त्याला शेततळे योजनेला आता 95 हजार अनुदान दिले जाईल. यापूर्वी केवळ 50 हजार रुपये दिले जात होते. शेतरस्ते जोडण्यासाठी महत्त्वाची योजना आखण्यात आली आहे. 1 किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी 2 लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आणखी 28 प्रकारच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री क्षिरसागर यांनी दिली.

राज्यातील बहुतांश भाग कोरडवाहू आहे. या भागात फलोत्पादन वाढावे, यासाठी राज्य शासनाने विविध योजना आखल्या आहेत. फलोत्पादनाखालील क्षेत्र वाढावे यासाठी मागेल त्याला शेततळे ही महत्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेसाठी आधिक निधीची तरतूद करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे क्षिरसागर यांनी सांगितले.

यावेळी शाहीर सचिन जाधव आणि हभप भांडे महाराज यांनी पोवाडा आणि भारुडाव्दारे विविध योजनांची माहिती दिली. यावेळी हभप प्रकाश महाराज बोधले, उपसचिव प्रमोद शिंदे, रोजगार हमी योजनेचे उपायुक्त अजित वार, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, उपसंचालक रवींद्र माने आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details