पंढरपूर (सोलापूर) -राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये जे नाजारीनाट्य सुरू आहे व त्यामुळे तेथील सरकार संकटात सापडले आहे. त्याची पुनरावृत्ती महाराष्टात होणार नाही, असा विश्वास राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पाटील म्हणाले की, सरकार पाडले तर सर्वांना राजीनामे देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल व पुन्हा निवडून येणे वाटते तितके सोपे नाही. भाजप उमेदवारालाही आपल्या मतदारसंघात पुन्हा निवडून येणे कठीण जाईल, कारण महाआघाडीतील तिन्ही पक्षांची ताकद त्यांच्या विरोधात असेल, त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारला सध्यातरी काहीच धोका नाही.
जलसंपदामंत्री जयंत पाटील आज हेलिकॉप्टरने पंढरपूर दौऱ्यावर पोहोचले. मात्र सध्या लॉकडाऊन आणि अनलॉकिंग सुरू असताना हेलिकॉप्टरबाबत त्यांना माध्यम प्रतिनिधींकडून विचारणा केली असताना, त्यावर त्यांनी हेलिकॉप्टरची लिफ्ट मिळाली त्यामुळे पंढरपुरात आलो, असे उत्तर देत वेळ मारून नेली.
जयंत पाटील पंढरपूर येथे राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी आले होते. यावेळी पालकमंत्री दत्ता भरणे, आमदार भारत नाना भालके यांची उपस्थित होती. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना जयंत पाटील म्हणाले, भाजपाने एकदा स्वतंत्र लढून बघावं, राज्यात त्यांना 60-65 जागांवरच समाधान मानावे लागेल. नुकतंच चंद्रकांत पाटील यांनी सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढून आपली ताकद दाखवावी, असं आव्हान दिलं होतं. त्याला जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. भाजपानेही स्वतंत्र लढावं त्यांना 60 ते 65 जागाच मिळतील, त्यापेक्षा जास्त जागा ते जिंकू शकणार नाहीत. असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
यावेळी त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेल्या वीज बिल वाढीविरोधातील आंदोलनाबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले, सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. वीज बिलाचा हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी नागरिकानी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. असे केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होत असली. तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आव्हान जयंत पाटील यांनी केले.