सोलापूर- ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार 'फ्रेंडशिप डे' म्हणून साजरा केला जातो. फ्रेंडशिप डे दिवशी तरुणाईचा उत्साह असतो. सोलापुरातल्या एका स्वयंसेवी संस्थेच्या युवकांनी मात्र सामाजिक प्रवाहाबाहेर असलेल्या पारधी समाजाच्या मुलांना फ्रेंडशिप बँड बांधून फ्रेंडशिप डे साजरा केला.
अनाथ पारधी मुलांचा फ्रेंडशिप डे
मैत्रीदिनाचे औचित्य साधून जयहिंद फुडबँकच्या सदस्यांनी मुळेगाव रोडवरील पारधी आश्रम शाळेतल्या अनाथ मुलांना फ्रेंडशीप बँड बांधून आणि खाऊ वाटप करुन फ्रेंडशिप डे साजरा केला. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी ही जयहिंद फुडबँकच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
आयुष्यात रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते शेवटपर्यंत साथ देते. आणि तिच खरी मैत्री असते. असे या तरुणांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे या शाळेतली ही मुलं जन्मताच कपाळी चोरीचा अन गुन्हेगारीचा शिक्का मारलेल्या उपेक्षित वर्गातील आहे. विशेष म्हणजे काहींचे आई-वडील गुन्हेगार म्हणून तुरुंगात आहेत. तर काहींच्या पालकांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अनाथांच्या मनांवर मैत्रीची फुंकर घालणारा हा उपक्रम सगळीकडे साजऱ्या झालेल्या मैत्रदिनापेक्षा लाख मोलाचा आहे.
यावेळी जयहिंद फुडबँक चे शुभम बल्ला, नवल अंध्याल, मंजु बंडा, बबलू इप्पलपल्ली, सुधाकर वंगारी , राहूल नल्ला,नरेश रुमाल, गोवर्धन पेंडम, नवीन गरदास, स्मितेश गूंडेटी, विवेक शंकुर, अभिलाष कोंडा हे उपस्थित होते.