सोलापूर- पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत गुन्हे दाखल झाले होते. सोलापूर शहर गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे व त्यांच्या पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी पंधरा दिवसांत चोरीस गेलेल्या मोटर सायकलची शोध मोहीम राबवून 11 लाख 66 हजार रुपयांच्या मोटार सायकली जप्त केल्या.
सापळा रचून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या
पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे पेट्रोलिंग करत असताना, एका खबऱ्याने माहिती दिली. चोरीस गेलेली काळ्या रंगाची हिरो कंपनीची विना नंबर मोटारसायकल, विक्री करण्यासाठी आरोपी रमेश रेवणसिद्ध बळुरगी (वय 21 मु.पो.मंगरूळ, रा.अक्कलकोट जि.सोलापूर ) हा आसरा चौक मार्गे शहरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. संशयीत चोरट्याला सापळा रचून पकडण्यात आले. त्याला ताब्यात घेऊन संशयीत आरोपी रमेश रेवनसिद्ध बळुरगी याच्याकडून कसून चौकशी केली असता, त्याने त्याच्या साथीदार मंगेश राजू आंबेकर व नामदेव बबन चुनाडे दोघे रा.पंढरपूर यांच्या मदतीने, सोलापूर शहर,सोलापूर ग्रामीण,कुर्डूवाडी,पंढरपूर, पुणे,तुळजापूर, लोनंद,सासवड, सातारा अशा विविध जिल्ह्यातून 18 मोटर सायकल चोरी केल्या असल्याचे कबूल केले.आरोपी नामदेव बबन चुनाडे हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
पंधरा दिवसांत गुन्हे शाखेने 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला
सोलापूर शहर गुन्हेशाखेने राबवलेल्या शोध मोहीमेत चोरीस गेलेल्या मोटर सायकल हस्तगत केल्या आहेत. गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर यांच्या पथकाने 5 मोटर सायकल, सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार यांच्या पथकाने 1 मोटर सायकल, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने 2 मोटर सायकल, पोलीस सब इन्स्पेक्टर शैलेश खेडेकर यांच्या पथकाने 1 अशा एकूण 31 मोटरसायकल व 11 लाख 66 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.