पंढरपूर (सोलापूर) -कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका ठप्प झाल्या आहेत. ग्रामपंचायत कायद्यात सुधारणा करुन ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. गावातील कोरोनाची स्थिती पाहून निवडणूक घेण्याच्या हलचाल राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने सुरू करण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींची गाव निहाय कोरोनाची स्थिती आयोगाने मागितली आहे. जुलै ते डिसेंबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींची मुदत पूर्ण होत असल्याने हा टप्पा जिल्ह्यासाठी महत्वाचा मानला जातो.
जुलैमध्ये 4, ऑगस्टमध्ये 123 ग्रामपंचायतींची मुदत पूर्ण झाली आहे. या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये एकाही ग्रामपंचायतीचा कालावधी पूर्ण झाला नाही. ऑक्टोंबरमध्ये 6, नोव्हेंबरमध्ये 519 आणि डिसेंबरमध्ये 6 ग्रामपंचायतींचा कालावधी पूर्ण होत आहे. नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक 519 ग्रामपंचायतींचा कालावधी पूर्ण होत आहे. गावाची निवडणूक होणार की प्रशासक येणार याबद्दल ग्रामस्थांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.