अमरावती - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज (2 मे) लागला आहे. यामध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवतडे हे विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. या निकालावरून अपक्ष आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा पराभव म्हणजे हा राज्यातील महाविकास आघाडीचे अपयश आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी राज्यातील जनतेची ईच्छा आहे, असेही ते म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार भरता भालके यांची काही महिन्यांपूर्वी दुर्दैवी निधन झाले होते. त्यामुळे येथील जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. त्यासाठी महाविकास आघाडीकडून तत्कालीन आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून समाधान आवतडे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. ही निवडणूक महाविकास आघाडी व भाजपने प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते.