सोलापूर- उजनी धरणातील पाणी साठा हा 'प्लस'कडे चालला आहे. उजनी धरणातील पाणी पातळी 10 जुलैला दुपारपर्यंत वजा 5 टक्केपर्यंत होती. उजनी धरणात सध्या दौंड येथून 4 हजार 683 क्यूसेक पाण्याचा विसर्ग येत आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढला की आज रात्री धरण हे 'प्लस'मध्ये येण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात येणारे पाणी हे पुणे जिल्ह्यातून येते. धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरणातील पाणी पातळी ही प्लसमध्ये येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा हा पुणे जिल्ह्यातील पडणाऱ्या पावसावर अवलंबून असतो. उजनीच्या धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्यावरच उजनीतील पाणीसाठा वाढतो. उजनी धरणाच्यावर पुणे जिल्ह्यात देखील धरण आहेत. पुणे जिल्ह्यात होणाऱ्या पावसाकडे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागलेले असतात. सध्या भीमा, सीना आणि नीरा या नदीच्या खोऱ्यामध्ये अपेक्षित पाऊस पडत नाही.